बाई - विजया मेहता - एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास

विजया मेहतांचे सहकारी आणि शिष्य यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले लेख, बाईंची एक मुलाखत आणि त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांबद्दल वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन म्हणजे बाई हे पुस्तक.
विजया मेहता मराठी रंगभूमीच्या एक आघाडीच्या रंगकर्मी. अभिनेत्री - दिग्दर्शिका. प्रायोगिक - व्यावसायिक रंगभूमीवर आपली छाप सोडणार्‍या. पुरुष, हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, रावसाहेब, अजब न्याय वर्तुळाचा, हयवदन, नागमंडल ही नाटके. स्मृतीचित्रे, रावसाहेब, पेस्तनजी हे चित्रपट, lifeline ही मालिका एकाहून एक दर्जेदार कलाकृती.
गेल्या वर्षी बाईंचं झिम्मा हे आत्मचरित्र वाचलं. त्यानी वैयक्तिक   जीवनाबरोबर आपल्या नाट्यप्रवासाचा उत्तम आढावा त्यात घेतला आहे. 
बाई हा त्या पुस्तकाचा उत्कृष्ट कंपॅनियन पीस आहे. त्यांच्या नाट्यप्रवासाकडे त्यांचे सहधर्मी कसे पहात होते, त्यांच्या प्रतिक्रिया हे पुस्तक आपल्यापुढे ठेवते. 
साधारणपणे प्रसिध्द व्यक्ति त्यांच्या सार्वजनिकतेमुळे आपल्या लिखाणात आणि विशेषत: आपल्या सहकार्‍यांबद्दलच्या वक्तव्यात सावध असतात. 'प्रियं ब्रुयात' या तत्वानुसार, वैयक्तिक चांगल्या आठवणी काढून गहिवरताना दिसतात. कलेची, craft ची प्रयोगांची फारशी चर्चा करताना आढळत नाहीत. 
बाई ह्या संकलनात मात्र जवळ जवळ सगळ्यांनी बाईंच्या काम करण्याच्या पद्धतीची, नाट्यजाणिवांची, craft ची बाईंच्या नाट्यसंप्रदायाची चर्चा केली आहे. आपली मते मांडली आहेत. माझ्यामते हे या पुस्तकाचं यश आहे. 
भास्कर चंदावरकरांचा तटस्थ आढावा एक कॅनव्हास तयार करतो. ज्यात सर्वजण अधिकाधिक रंग भरतात. महेश एलकुंचवार बाईंना महत्वाचे प्रश्न विचारतात. किशोरी आमोणकर आणि विजया मेहतांच्या संवादाच्या निमित्ताने घडलेले चिंतन - प्रतिभावान जागृत सर्जक कलाकाराचे तश्याच दुसर्‍या कलाकाराबरोबरचे - हे तर काव्य आहे. 
महेश एलकुंचवारांचा लेख मला महत्वाचा वाटतो. त्यांना वाटलेली आशा की बाईंबरोबर ते प्रायोगिक रंगभूमीवर नवीन पायंडा पाडणारे   काही तरी करु शकतील. तेव्हढ्या दोघांच्या तारा जुळल्या असे वाटले म्हणू न. पण मग ते न शक्य झाल्यावर तेवढाच समजुतदारपणा बाईंना आपला मार्ग निवडण्याचा हक्क आहे हे मान्य करुन आपल्या मार्गाने चालण्याचा. त्यांचा 'वाडा चिरेबंदी' च्यावेळचा अपेक्षा पूर्ण करणारा अनुभव. बाईंनी जशी व्यावसायिक रंगभूमीची दिशा बदलली तशी त्या प्रायोगिक रंगभूमी ही वेगळ्या उंचीवर नेऊ शकल्या असत्या हा विश्वास. फारच छान लेख.
शिष्यांपैकी रीमा, विक्रम गोखले, सुहास जोशी, नीना, मंगेश, प्रतिमा हे तमाम कुळकर्णी, विजय केंकरे यांच्या लेखातून बाईंचे वेगवेगळे पैलु दिसतात. आपल्या कलाकारांच्या पाठीशी उभ्या रहाणार्‍या, त्यांचे लाड करणार्‍या, त्यांच्या तोंडावर त्यांचं कौतुक न करणार्‍या, त्यांच्या चुका परखडपणे दाखवणार्‍या, प्रसंगी काहिश्या अलिप्त व्यक्तिमत्वाच्या बाई आपल्यासमोर उभ्या राहतात. हा भाग मोठ्या खुसखुशीत नोटवर संपतो बाईंच्या यजमानांच्या "Last Word" ने.
तिसरा भाग बाईंनी लिहलेल्या लेखांचा. 
पीटर ब्रुक ने दिग्दर्शित केलेल्या महाभारताचा प्रयोग बघून बाईंनी काढलेली टिपणे सगळ्यात वाचनीय. महाभारताचे बाळकडू मिळालेल्या भारतीय आणि एक प्रयोगशील नाट्यरंगकर्मी म्हणून त्यांची ब्रुक च्या प्रयोगाला होणारी प्रतिक्रिया खूप काही सांगणारी आहे. 
बाईंनी डॉ. लागुंना "एक चांगल्यातला उत्तम अभिनेता" अशी दाद देणे आणि त्याचे व्यवस्थित विश्लेषण करणे. वाचनीय. ह्या पुस्तकात लागुंचा बाईंबद्दल लेख हवा होता अशी चुटपुट लागते. 
इतर वेळी सावध असणार्‍या बाई भक्ति बर्वेवरच्या लेखात मात्र हळव्या झालेल्या दिसतात. 
कलाकाराच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल, craft बद्दल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. विजया मेहता या प्रतिभावान, मेहनती, meticulous रंगकर्मी स्त्रीच्या सर्जनप्रक्रियेचे दोन पैलु या पुस्तकांमुळे पहायला मिळले. आता बाईंनी मनावर घेऊन परत प्रयोग करायला सुरवात केली तर तिसरा महत्वाचा पैलु ही अनुभवायला मिळेल... All beutiful things come in three, dont they?

Comments