मागोवा - नरहर कुरूंदकर

मागोवा हा कुरुंदकरांच्या सहा इतिहासाबद्दलच्या लेखांचा संग्रह आहे. हे लेख त्यांनी दिलेल्या भाषणाच्या रुपाने सुरु झालेल्या चिंतनाचे परिष्कृत लिखित स्वरुप आहे. लेखांचे विषय महाभारत आणि काव्य, संभाजी ते थेट चार्वाक मतापर्यंत भरा-या मारतात. कुरुंदकरांच्या शैलीचा थेटपणा, थोरांचे मोठेपण कुठे आहे ते दाखवुन, त्यांच्या वलयाची भीड न बाळगता त्यांची मते खोडुन काढण्याची शैली या पुस्तकात उठुन दिसते. कुरुंदकरांच्या शब्दात सांगायचे तर --
इतिहासाला सत्य ही एकच देवता असते. आणि म्हणून व्यक्तींच्या मोठेपणाची फारशी मातब्बरी इतिहासाला नसते. आजच्या राजकीय गरजा अगर आजची `उपयुक्त' श्रध्दास्थाने यांची बूज राखणे इतिहासाला जमणे शक्य नाही ... ऐतिहासिक अभ्यास म्हणजे प्राचीन भारताविषयींच्या गौरवगीतांनी गहिवरून जाणे अशी माझी समजूत नाही. त्याचप्रमाणे प्राचीन भारताला नानाविध दोषांनी दागाळणे यातही मला फारसा पुरुषार्थ वाटत नाही. जीवनाची गुंतागुंत भुतकाळातही होती. तिचे काही दुवे सापडले तर काही दुवे सापडतच नाहीत. सर्व प्रश्नांची संगती एखाद्या चौकटीत सरधोपटपणे लावण्याची माझी तयारी नाही. पुराव्याने जे सिध्द होईल ते स्विकारत, सर्व गुंतागुंती मान्य करित, ऐतिहासिक दृष्टिकोन स्विकारून कुठवर वाटचाल करता येते ते पाहण्याचा प्रयत्न करणे इतकाच या आकलनाचा हेतु आहे. त्यामुळे काही नवी अभिमानस्थाने समोर आली तर ती नाकारलेली नाहीत. आणि काही श्रध्दास्थाने ढासळली तरी फारशी चिंता केली नाही. भूतकाळात, वर्तमानकाळ वाचण्याचा प्रत्येक प्रयत्न शक्यतो दूर ठेवला ... पण या बाबतीत माणूस दुबळा असतो. त्याच्या पहाण्याच्या पध्दतीतच वर्तमानकाळ निहित असतो या मर्यादांची मला जाणिव आहे.
शाकुंतलावरच्या लेखात त्यांनी एकाच कथित घटनेची तीन रूपे दाखवुन दिली आहेत. एक ऐतिहासिक - काय घडले असावे, दुसरी पौराणिक भाटांची कथा आणि तिसरे एका महाकवीच्या प्रतिभेने त्याला दिलेले रुप. ह्या आणि इतर आख्यायिकांबद्दल अनेक शक्यता उभ्या करतो हा लेख. ऐतिहसिक कादंब-याच्या माध्यमातुन glorify झालेल्या व्यक्तिरेखा कुरुंदकरांच्या सत्यनिष्ठ आणि जाणकार नजरेने बघताना वेगळ्या दिसतात. शिवाजीमहाराज, संभाजी महाराज आणि पेशवे यांच्या राजकारणातली समान सुत्रे दाखवतात. त्यांच्यावर लादलेले वर्तमानकालीन दृष्टीकोन टरकावतात. लोकायतांवरच्या लेखात, भारतीय तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचे, त्यातल्या मतभिन्नतेचे दर्शन घडते. कुरूंदकरांचे लेखन माझ्यासाठी नेहमीच विचाराची नवी दालने उघडते. हे पुस्तक 'परत वाचायला हवे' या यादीत समाविष्ट.

Comments

Post a Comment