५७ वा सवाई गंधर्व महोत्सव

ह्या सालचा गंधर्व Swine Flue मुळे Jan मध्ये झाला. त्यामुळे, ०९ हे गंधर्व न घडलेले साल आणि १० हे दोन गंधर्व घडलेले साल म्हणुन इतिहासात नमुद होणार. माझ्या वैयक्तिक इतिहासात हे साल पहिल्यांदा गंधर्व अनुभवले म्हणुन स्मरणिय होणार. तशी मी सांगितिक दृष्ट्या मर्यादित स्त्री आहे. म्हणजे musically challenged. मला काही सुर, बेसुर, ताल इ. कळत नाही. रावसाहेबांसारखं रागिणिचा पदर ढळलेला वा रागाचा कासोटा सुटलेला तर अजिबात समजत नाही. माझं ऐकणं म्हणजे निर्मल आनंद के लिये! गंधर्वबद्दल मी वर्षानुवर्ष ऐकत आले होते पण या वर्षी ते ऐकायला मिळालं त्याबद्दल मी माझ्या आईबाबांची, नवऱ्याची आणि मुलीची अतिशय आभारी आहे आई बाबा दरवर्षी जातात, ह्या वर्षी मला घेउन गेले. आणि उरलेल्या दोघांनी माफकच अजिबात कटकट केली नाही. तीन दिवस वगैरे काही जमण्यातले नव्हते त्यामुळे एक दिवस - शुक्रवारी जायचे ठरले. त्या दिवशी श्रीनिवास जोशी आणि हरीप्रसाद चौरासिया ऐकायला मिळाले.

माझ्या untrained कानाला श्रीनिवास जोशींचे गायन random वाटले. एकसंधता किंवा एक विचार पुढे नेल्यासारखा वाटला नाही. त्यांच्या भिमसेनांवरच्या रचना, वर्गात केलेल्या assignments सारख्या वाटल्या. हरिप्रसादांनी कानाचे पारणे फेडले. He is the maestro! प्रत्येक रचनेत त्यांनी एक मूड, एक मौसम, एक कहाणी उभी केली. त्यांच्याबरोबर साथीला तबल्यावर घाटे आणि पखवाजावर भवानीशंकर होते. त्या तिघांची chemistry मस्त जमली होती! लयीबरोबर त्यांचा चाललेला खेळ अनुभवायला मजा आली.

त्या दिवशीच्या अनुभवाने परत जायचे वेध लागले. रविवारी राजामिया, सत्यशील देशपांडे,मल्लिका साराभाई आणि प्रभा अत्रे असा भरगच्च कार्यक्रम होता. राजामिया काही जमले नाहीत. त्यांच्या आवाजात मला एकप्रकारचा burr जाणवला. सत्यशील देशपांडेंचे गाणे मला विचारांमधुन विकसित झाल्यासारखे जाणवले. त्यांनी पेश केलेली ’बन मे, सावन मे’ त्यांनी सांगितले तशी सुंदर musical haiku होती. त्यांनी सादर केलेले निर्गुणी भजन ’ना जाउंगी’ पण खुप भावले.

मल्लिका साराभाईंबरोबर त्यांचा मुलगा रेवंथास ही होता. मला आधी जरा शंका वाटली पण खरं तर त्याने बाजी मारली. त्याच्या performance मधली precision आणि energy मस्तच होती त्याने सादर केलेले ’श्रीरामचंद्र कृपालु भज मन’ ही तुलसीदासांची रचना, त्यातल्या संचारी भावात त्याने सादर केलेले रामचरित्रातले शिवधनुर्भंगासारखे प्रसंग बघायला मजा आली. नंतर दोघांनी सादर केलेली शिवपार्वतीची नृत्यस्पर्धा spectacular होती. आनंद देशमुखांचं निवेदन मोजकं पण खुसखुशीत होतं. मल्लिकांच्या नृत्याबरोबरच्या निवेदनाने त्यांची चांगली परीक्षा घेतली. निवेदन आधीच इंग्रजीत त्यात असलेले नृत्यपरिभाषेतले शब्द! पण देशमुखांनी त्यात आधीच प्रेक्षकांना विश्वासात घेउन मजा आणली.

प्रभा अत्रेंचे गाणे अपेक्षित परिणाम साधु शकले नाही. कधी कधी मला वाटते की जेष्ठ कलावंतांना वेळेचे बंधन काचते. इतर अनेक ठिकाणी कानाडोळा करणारे प्रशासन, इथे मात्र नियमांचा बडगा घेउन उभे रहाते.

गंधर्वचा प्रेक्षक हा एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. तो पार सांगली हरिपूरहुन खास गंधर्व ऐकायला येतो. सकाळपासुन सतरंजी पसरुन जागा पकडायची साधना करतो. शेजारच्या सतरंजीवर बूड हजर नसेल तर खुशाल त्या सतरंजीची घडी करुन ठेवुन जागा बळकावतो. गाणे पटले नाही तर अंग टाकुन झोपी जातो. ’कोच’ वर्गात, "यावेळी बाईंचा सूर काही लागला नाही" अशी intellectual category, आणि सांस्कॄतिक पटाचा भाग असण्याचा अट्टाहास असणाऱ्या महिला यांचा भरणा जाणावला. ही मंडळी सारखी आतबाहेर करतात बुवा! आणि भारतीय बैठकीचा रसभंग करतात! काहींना तर "दुस्रुंदा, तिस्रुंदा काय जाता? एकदाच काय ते आटपुन या की’ असे सारखे म्हणावेसे वाटत होते.

तर सवाई गंधर्व हा एक अनोखा अनुभव होता. तो परत परत घ्यायची आता तहान लागली आहे.

Comments