दिवाळी पहाट कार्यक्रम
ही पुण्याच्या अभिजात संगीत डायरीची पहाट असते. किंवा असे म्हणाना की येउ घातलेल्या
वार्षिक संगीत नाटकाची नांदी असते. ह्याच्यापुढे आता सवाई, स्वरभास्कर,
वसोंतोत्सवाचे वेध लागले आहेत. आता पुढचे चार महिने कानाचे चोचले पुरवणार, मनसोक्त
संगीत ऐकणार ह्या विचाराने दिल अगदी खुश होवुन जाते.
पी वाय सी क्लबच्या
दिवाळी पहाट कार्यक्रमाने ही नांदी मोठ्या डौलाने साजरी झाली! सादर करणारे कलाकार
होतेच तश्या तोलाचे! विजय कोपरकर, सावनी शेंडे साठ्ये, आनंद भाटे, तबला साथ रामदास
पळसुळे, टाळ साथ करायला माउली टाकळकर आणि एक आगळेपण म्हणजे पेटीऐवजी साथीला राहुल
गोळेच्या सुरेल बोटांमुळे विशेष रंगत भरणारा ऑर्गन होता. सुत्रसंचालन केले मिलिंद
कुलकर्णींनी.
कार्यक्रमची सुरवात
झाली संगीत शाकुंतलच्या "पंचतुंड नररुंडमालधर" या नांदीने. त्यानंतर विजय
कोपरकरांनी "तेजोनिधी लोह्गोल" आणि "योगीया दुर्लभ" सादर केले. तोपर्यंत कार्यक्रम
सपाट पातळीवर चालला असे वाटत होते, म्हणजे होते सगळे चांगले पण तरीही मझा नव्हता
येत. कुलकर्णींचे संचालन जरा पसरट वाटत होते आणि कोपरकरांच्या गाण्यात चमक दिसत
नव्हती. त्यानंतर, सावनीने, "सोहम हर डमरु बाजे" सुरु केले आणि मैफिलीचा खरा सुर
लागला. आणि उत्तरोत्तर मैफिल रंगत गेली. कुलकर्णींना आपला सुर गवसला. सावनीच्या
पुढच्या "बोलावा विठ्ठल" ने कमाल केली. त्यानंतर आनंद भाटेचे "गुरु महाराव" आणि
"मला मदन भासे हा" ही त्याच्या लौकीकाला साजेलशी सहज आणि दमदार पुढची कडी होती.
त्यानंतर सावनीने सादर केले मीरा भजन "सूनो सूनो दयाने म्हारी अरजी" ह्या गाण्यात
तिनी आणलेला राजस्थानी लोकसंगीताचा बाज मस्तच होता. त्यानंतर तिने सादर केला दादरा
"सैंया रुठ गये मै मनाती रही" मनात आले, "बाईग तु इतक्या लडीवाळपणे मनवत असशील तर
सैंय्या वारंवार चान्स मारणारच!", मग आनंदने सादर केले सुरेल "वद जाउ कुणाला शरण"
आणि विजयजींनी ठरवले की "हम भी कुछ कम नही" हे दाखवायला हवे! आणि त्या चढत्या
कमानीत त्यांचे "बोलु ऐसे बोल" आणि "सुरत पियाकी" डौलात झळकले. पळ्सुळेंच्या सोलो
वादनाने बहार आणली. अजिबात संपु नये असे वाटणा-या कार्यक्रमाची सांगता झाली
"चिन्मया सकला" या आनंद भाटेच्या सुरेल भजनाने. मनाची घागर सुरांच्या वर्षावाने
काठोकाठ भरली आणि दिवाळीच्या सर्व दिवस आनंदाने हिंदकळते आहे!
Comments
Post a Comment