फिल्मी कथक

प्रियाने मला एक मस्त कल्पना दिली, की तू  कथक वर आधारित फिल्मी गाण्यांची प्लेलिस्ट बनव. मला ही  एक बहाणा मिळाला.  वेगवेगळे filters टाकून मनसोक्त कथक videos  बघितले. आताही खरं म्हणजे गाणी बघण्याचा मोह मोठ्या मुष्किलीने आवरून हे लिहायला घेतले.

ही नोंद ही सगळी गाणी बघताना केलेली निरिक्षणे आणि निष्कर्ष.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, जेंव्हा सिनेमात, नायिकांची शास्त्रिय नृत्ये दाखवण्याची फॅशन होती - म्हणजे नायिका बी ए ला शिकत असायची आणि कॉलेजच्या प्रोग्रॅम मध्ये डान्स करायची किंवा चॅरीटी शो करायची तेंव्हा -  सगळ्या नायिका दाक्षिणात्य नृत्यात कुशल होत्या, त्यामुळे त्यांची गाणी ही त्या नृत्यावर आधारित आहेत.  उदा. "मतवाली नार ठुमक" इ. कथक जाणणार्‍या होत्या त्या वॅम्प्स, पण त्यांच्या वाटेला  शुद्ध नृत्य फार क्वचित आले.  

दुसरा उछ्छाद म्हणजे, असे गाणे असायचे मोहम्मद रफ़ी किंवा मन्ना डे यांच्या आवाजात. म्हणजे गाणार हीरो! मग सगळं फुटेज पण हा बाबा च खाणार. याचं  लाक्षणिक उदाहरण म्हणजे कोहिनुर मधलं "मधुबन मे राधिका नाचे रे..."  खास गाणे!  कुमकुम चे नृत्य ही कथक आहे पण चित्रपटात गाणारा आहे दिलीप कुमार, त्यामुळे कडवे सुरु असताना कॅमेरा ह्याच्यावर. आणि जेंव्हा कुमकुमवर न्यावा लागतो, तिथेही हा परत फ्रेममध्ये पाहिजे! कहर म्हणजे "घुंगटा मुखपर डालके" हे ही आधी हा करून दाखवणार, शिवाय सतार वाजवणार! मग उरलेल्या interludes कुमकुमचे कथक! पण तरिही नक्की या गाण्याला माझ्या प्लेलिस्ट मध्ये मानाचे स्थान.  choreography आहे गुरु सितारा देवींची.

ह्याचे अजुन एक उदाहरण "नाचे मन मोरा मगन तिगदा धिगी धिगी" मेरी सुरत तेरी आखें. अशोक कुमार, आशा पारेख. ह्या सिनेमात अशोक कुमार ठार काळाकुट्ट दाखवलाय. हे गाणे तो अंधारात पण स्टेजवरच बसुन गातो. आणि आशा पारेख नाचते. तरिही कडव्याला कॅमेरा अंधारावर. फक्त अशोक कुमारचे दात दिसतात. आशा ने कथक केले आहे पण माझ्या अल्प मतीला तिचे fillers फारच प्राथमिक वाटतात. 

("राधिके तुने बन्सरी चुराई" - सुनील दत्त वैजयंती माला म्हणून नृत्य सेमी क्लासिकल. पण तिच गोष्ट. सुनील  नुसता गातच नाही मधुन मधुन कृष्ण म्हणून नाचात पण. मराठीत अशोक सराफ अग नाच नाच राधे... जिथे तिथे  घुसखोरी. का होते असे? नार्सिसिज्म? का जनरंजकता? मुक्कद्दर का सिकंदर मध्ये अमिताभ रेखाला तिचा मुजरा पण धड म्हणु देत नाही हो! मध्ये घुसतो ... इसके आगेकी दास्ता अब मुझसे सुन म्हणे! गाउदे ना तिला!)

सत्यजित रे नी आपल्या चित्रपटात, प्रसंगाची मागणी होती तिथे सुंदर कथक नृत्ये गुंफली आहेत एक नाही दोन. 
एक आहे जलसाघर या त्यांच्या बंगाली चित्रपटात. आता चित्रपट च जलसाघर असल्याने त्यात शास्त्रिय संगीत फार उत्तम आहे. विलायत खां यांचे संगीत आणि सलामत अली, बिस्मिल्ला खान, बेगम अख्तर यांच्यावर प्रत्यक्ष चित्रिकरण. त्यात गुरु रोशन कुमारी यांचे उत्तम नृत्य चित्रित आहे. गुरु रोशन कुमारी ह्या जयपुर घराण्याच्या आदरणिय गुरु आहेत



दुसरे कथक आहे शतरंज के खिलाडी मध्ये. ही कथा आहे नबाब वाजिद अली शहांच्या अवध ची. वाजिद अली स्वत: कथक रचनाकार होते, कृष्ण बनून नृत्य करायचे ( deja vu?) तर ह्या सिनेमात गुरु शाश्वती सेन यांचे कथक आहे(आणि महत्वाचे, वाजिद अलीचे काम करणारा अमजद खान,ते नृत्य बघतो नाचत नाही! ). गुरु शाश्वती सेन ह्या लखनौ घराण्याच्या, पंडित बिरजु महाराजांच्या शिष्या नृत्य सादर करतात. choreography पंडित बिरजु महाराजांची, बिरजु महाराज हे लखनौच्या महाराज घराण्यातली चौथी पिढी.  मोठा हरफनमौला कलाकार. A true polymath! 


ही दोन नृत्ये बघितल्यावर जाणवते ना? लखनौची नवाबी नजाकत आणि जयपुरचे चमकदार आणि कुसरयुक्त (intricate) पदलालित्य!

आता नाव आलेच पाहिजे गुरू गोपीकृष्ण यांचे. त्यांचे अप्रतिम नृत्य बघायचे झनक झनक पायल बाजे मध्ये.  गोपीजी बनारस घराण्याचे, शिवाय भरतनाट्यम ही शिकले होते. त्यांचे नृत्य आक्रमक आहे, मर्दानी. झनक झनक मधले शिव तांडव हे चांगले उदाहरण आहेच पण हा तुकडाही बघण्यासारखा

ह्या मुलुखगिरीमध्ये मला youtube वर एक नृत्यरत्न मिळाले, १९६० च्या परिणितामधले गुरु गोपीकृष्ण आणि गुरु रोशन कुमारी यांचे एक स्टेज नृत्य. एक आगळे कथक. पण तरिही कथक. कथा सांगणारे.



माझ्यामते एक चांगले कथक गाणे बनायला चार जिनसांची चांगली भट्टी जमावी लागते. नर्तकाचे कथक कौशल्य,  नृत्य दिग्दर्शकाचे कथक रचना कौशल्य, दिग्दर्शकाचे चित्रिकरण कौशल्य आणि संगीत.  जिथे हे चारही जुळून आले आहेत, अशी गाणी एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढी ही नाहीत असे मला वाटते. 

कथक चा प्रयोग तवायफ मुजर्‍यात दिसतो. चांगला choreographer असेल तर गाणे चांगले जमते पण दोन्ही नर्तक आणि choreographer चांगले असे उदाहरण मला नाही सापडले. 
उल्लेख करण्यासारखे आहे उमराव जान ज्याची choreography  गुरुगोपीकृष्ण यांची आहे आणि पाकीजा पंडित  बिरजु महाराजांचे काका पंडित लच्छन महाराज यांचे. मीना कुमारीपेक्षा रेखा नृत्यात सरस आहे, त्यामुळे उमराव जान मध्ये लॉंग शॉट्स नाही वापरावे लागत. 
एक जाता जाता नमूद करण्यासारखे गाणे - खुबसूरतमधले "पिया बावरी..." त्यात शशीकलांना कथक तालीम आहे आणि रेखाला नाही, हे जाणवते.

बैठकीच्या अदाकारीचे सुंदर नमूने आहेत सरदारी बेगम चित्रपटातील ठुमरी सादरीकरणात. स्मृती मिश्राने छान पेश केल्या आहेत, गुरु रोशन कुमारी यांच्या रचना, "राह में बिछी है पलके आओ" आणि "घर नाही हमरें श्याम" 


नर्तक आणि संगीतकार उत्तम असून ही रचना आणि चित्रिकरणाने घालवलेले गाणे म्हणजे निवडूंग मधले  "ना मानोगे तो दुंगी तुझे गाली रे..." तसं हे सगळ्या निवडूंग सिनेमाबद्दल ही म्हणता येईल नाही? 

आता ही दोन नृत्ये. ह्या दोन गाण्यांना जोडणारे किती दुवे आहेत. हे सिनेमे राजपुरुष आणि त्यान्च्या सत्य - मिथकाच्या रेषेवरच्या प्रेयस्यांची गोष्ट सांगणारे. दोन्ही चे दिग्दर्शक magnum opus  बनवणारे, भव्य सेट्स ची हौस असणारे. आणि  एका चित्रपटाचे choreographerकाका तर दुसर्‍याचे त्यांचाच पुतणा. 
एक मोगले आजम मधले "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे" तर दुसरे  बाजीराव मस्तानी मधले "मोहे रंग दो लाल". मला तर खात्री आहे, संजय लीला भन्साली ने बिरजु महाराजांना सांगितले असणार, "महाराज जी मोहे पनघटसे बढकर होना चाहिये!"
ह्या दोन्ही  गाण्यात तीन गोष्टी जुळल्यात, आणि चौथी म्हणजे नर्तकींचे कौशल्य कमी पडलेय ते त्यांच्या निखळ सौंदर्याने भरुन काढलेय, आणि अर्थात long shots ने.  माझ्या मते दिपीका नृत्यात काकणभर सरस ठरलीय आणि सौंदर्यात कोण हे ज्याने त्याने ठरवायचे. 





कथक बद्द्ल सांगणारी बिरजु महाराजांची एक clip  बघितली youtube वर.  त्यात त्यांनी सांगितले की कसे त्यांच्या काकांनी - वडलांनी कथक मध्ये एक शब्द - एक भाव व्यक्त करणा-या असंख्य अदा रचल्या. त्याचे उदाहरण म्हणुन ते लाल रंगाबद्द्ल सांगतात - लाल -  सिंदुर का रंग लाल - पान से होंठ लाल और जो उंगली पे सुई चुभ गई और रक्तबिंदु उभरी उसका रंग लाल. हे सगळं मोहे रंग दो लाल मध्ये त्यानी इतक्या subtly आणलंय की ते आहे पण नजर असेल तर दिसेल. उगाच गवगवा नाही. 
 प्रतिमांनी गोष्ट सांगण्याची दोन घराणी आहेत नाही का? एक जे आपल्या सादरीकरणात ह्या प्रतिमा हळुवार गुंफते आणि रसिकाला छुपी खूण सापडल्याचा आनंद देते. आणि दुसरे, "तिच्या मनात प्रेम वर्षानुवर्षे अमर राहिले" हे दाखवायला तिच्या हातातला कधीच विझु न दिलेला दिवा दाखवायचा खटाटोप करते. 

अजून दोन गाणी - ह्यात जे नर्तक आहेत ना, ते कुशल आहेत पण दुसर्‍या नृत्य प्रकारात. सुचित्रा म्हणते तसं कथक चा stance or bearing हे वर्षानुवर्षे केलेल्या रियाजाने येतो. नुसत्या अदा copy करुन नाही. त्या प्रमाणे या नर्तकांचं bearing  दुसर्‍या नृत्यप्रकाराचं आहे. तरिही हया गाण्यांची भट्टी खासी जमली आहे. 
एक लेकीन मधले "झुटे नैना बोले" ... हेमामालिनी चे भरतनाट्याचे bearing जाणवते बघा. choreography आहे गुरु रोशन कुमारींची. 


आणि दुसरे जे मला माहित नव्हते - ह्या मुशाफिरीत सापडले - विश्वरुपम मधले - कमल हसन चे "मै राधा तु श्याम." ह्यात कमल हसन बहुतांशी सफल आहे.  पंडित बिरजु महाराजांची नकल उतरवताना रेसभर जास्त झालाय, त्यामुळे तो महाराजांसारखा सहज न राहता, caricature कडे झुकतो. अगदी थोडासाच बरका, (Update: आता, ह्या चित्रपटाची कथा कळल्यावर हे caricaturing intentional आहे हे समजले. )पण... असो. 
आणि choreography, बिरजु महाराजांची. 


And then there is Madhuri! बाकी काही बोलायची गरज रहात नाही. ती उत्तम कथक नर्तिका आहे. 
देढ इश्किया मधले "जगावे सारी रतिया" हे गाणे कथक नृत्याचा उत्तम नमुना आहे पण कथेच्या मागणीमुळे त्याच्या चित्रिकरणात इतर गोष्टी घुसतात, जगावे चे choreographer आहेत  पंडित बिरजु महाराज.

ह्या गाण्यात मात्र भट्टी खाशी जमुन आली आहे. दिवा तेवत ठेवणारा दिग्दर्शक, एक अप्रतिम कोंदण ह्या हिर्‍यासाठी बनवतो. हिरो  गाण्यात असून ही दोन चार सुस्कार्‍यापलिकडे फारसा व्यत्यय आणत नाही. पंडित बिरजु महाराज कथक जाणणार्‍या माधुरीसाठी खास choreography करतात. सरसे मोरी चुनरी गयी सरक सरक असो की आहट सुन... माधुरीच्या प्रत्येक हावभावात लय आहे. सहज grace आहे. माझ्या प्लेलिस्ट मधला हुकमाचा एक्का.
"काहे छेड मोहे"

आता एवढं कथक डोळ्यात साठल्यावर, कोणी आपल्याला बघत नाही हे बघुन  मी जरा  "चाल मतवाली" चालून बघते,,, पण ... जाउद्या...


Comments

Post a Comment