जपानी सौंदर्यशास्त्रात (aesthetics) तरलतेला (subtlety) विशेष स्थान आहे. बहुदा ही तरलता झेन तत्वज्ञानाच्या प्रभावातून कलांमध्ये उतरत असावी. निसर्गातील सहजता, अपूर्णपण, क्षणभंगुरता खरंतर निसर्गाचा भाग म्हणून माणसांच्या जीवनाचा भाग असायला हवेत. इकेबाना, ओरिगामी सारख्या जपानी कला आणि "वाबी साबी" हा जपानी विचार प्रवाह विशेष उल्लेखनीय आहेत. "वाबी साबी" - The aesthetic is sometimes described as one of beauty that is "imperfect, impermanent, and incomplete" "अपरिपूर्ण, अनित्य आणि अपूर्ण" आणि तरीही सुंदर किंवा म्हणून सुंदर.
ही पार्श्वभूमी हायकूंचा आस्वाद घेताना लक्षात ठेवली पाहिजे. हायकू हा तीन ओळींचा छोटासा काव्यप्रकार. पण ही सूत्रे नव्हेत तर तरंग आहेत. क्षणचित्रे. आस्वाद घेणाऱ्याच्या मनात असेल, तर ती खोली, ती मिती त्या चित्राला प्राप्त होईल, पण हायकू, संदर्भ, उल्लेख यांचा वापर अर्थनिर्मितीसाठी करणार नाही. त्या तीन ओळी म्हणजे हा क्षण, जे काही आहे ते त्या क्षणात!
हायकूची सुरवात झाली ती रेंगो ह्या दीर्घ काव्याचे सुरवातीचे कडवे म्हणून. तेंव्हा त्याला होक्कु म्हणत. हायकु हे स्वतंत्र अस्तित्व नंतर प्राप्त झालं.
हायकूचे काही महत्वाचे संकेत असे आहेत. अलिखित संकेत बरेच आहेत पण हे ठळक
- हायकू दोन भागांचे असते. एक phrase आणि एक fragment. पहिली किंवा तिसरी ओळ हे fragment आणि उरलेल्या दोन ओळी phrase. एक अनुभव आणि त्याला एक अधोरेखन(highlighting). हे अधोरेखन एक कलाटणी असेल, तुलना असेल, रंग गहिरे करणे असेल. ह्या दोन्हीच्या ताणातून हायकू बनते. अल्पाक्षरतेने, कवीला कुठले अधोरेखन करायचे आहे ते सांगायला (जणू, किंवा, पण) असे शब्द वापरण्यात रुची नसते आणि त्यामुळेच की काय, अशा छोट्या काव्यांमध्ये अर्थाच्या अनेक शक्यता त्या रचनेची श्रीमंती ठरते. त्या तीन ओळींपैकी कुठल्या दोन ओळी एक विभाग बनवतात, कुठला भाग अनुभव आणि कुठले अधोरेखन. ह्या शक्यतांमधून हायकू वाचकाच्या आस्वादाची रंगत वाढवते.
- Cutting - काही विशिष्ट जपानी symbols हे हायकूला दोन भागात कापतात, पण ती चिन्हे कोणताही अर्थ (जणू पण शब्दांप्रमाणे ) सूचित करत नाहीत. काही इंग्रजी भाषांतरात त्या जागी : किंवा - किंवा … ही विरामचिन्हे वापरतात, पण ही विरामचिन्ह खरंतर काही अर्थांसकट येतात.
- हायकू हे ॠतुंबद्दल असावेत असा संकेत होता, उघड उल्लेख किंवा सूचन असावे. अर्थात आधुनिक काळात हा संकेत पाळला जाईलच असे नाही.
Spring:
A hill without a name
Veiled in morning mist.
the moon so pure
a wandering monk carries it
across the sand
हायकूच्या हे संकेत जाणून घेताना मला साहजिकच उर्दू शेर आणि त्या शायरीच्या संकेतांची आठवण येते. अगदी 17 वर्णांचे नसले तरी शेर ही अल्पाक्षरीच. दोन ओळीतले पूर्ण विश्व. अशीच अर्थांच्या शक्यतांचा लुत्फ़ घेण्याचा रिवाज. शेर मुशायऱ्यात पेश करण्यासाठी लिहिले जातात. त्यामुळे शायर, त्या पेशकारीची नाट्यमयता वाढवण्यासाठी, ऐकणाऱ्याची उत्कंठा वाढवत, punch point दुसऱ्या ओळीच्या जितक्या शेवटी सांगता येईल तितका नेण्याची कोशीश करतात. शिवाय अंतर्गत लय, ध्वनींचे पुनरावर्तन ह्या सगळयांची मजा ही ऐकण्यात आणि पेश करण्यात आहे.
Lost in translation हा प्रकार कविंतांच्या बाबतीत घातक. विशेषत: हायकू सारख्या तरल आणि अल्पाक्षरी प्रकारात तर फारच. आग्रही(heavy handed) भाषांतरकार आपले interpretation त्या हायकूवर लादतात. तर काही भाषांतरकारांना ह्याची जाणिव असली तरी त्यांच्या भाषेचा, विरामचिन्हांचा हायकूला रंग लागतोच.
मात्सुओ बाशो हा सतराव्या शतकातला जपानी कवी आणि प्रवास वर्णनकार, हा जपानमध्ये कवींचा देव मानला जातो. त्याच्या हायकू ह्या masterpieces समजल्या जातात. त्याच्या काळात हायकू ह्या अजून होक्कू होत्या, रेंगाच्या opening lines. पण बाशोने त्या आपल्या प्रवासवर्णनात त्या क्षणचित्रे म्हणून वापरल्या. हायकू हे नाव त्यानंतर 300 वर्षांनी आले.
त्याच्या हायकूच्या काही भाषांतरांच्या उदाहरणावरून मी माझा मुद्दा मांडते.
Poverty's child -
he starts to grind the rice,
and gazes at the moon
ही त्याची बेडूक हायकूच्या खालोखाल प्रसिद्ध हायकू असावी. खालील ओळीत ह्या हायकूचे A) हे जपानी शब्द, आणि B) हे शब्दश: भाषांतर,
A) Shizu-no | ko | ine-suri-kakete | tsuki | wo | miru
B) Poverty’s child | rice-grind-starting | moon | at | looks
आता परत जाऊन वाचले तर वरचे हायकू चे भाषांतर and हा शब्द पदरचा घालून आपल्या आस्वादाला दिशा देते, जी बाशोला अभिप्रेत असेल किंवा नसेल ही. किंवा अनेक शक्यतांपैकी एक असेल.
आता हे अजून एक भाषांतर,
Poor Boy - leaves
Moon-viewing
For rice grinding
ह्या भाषंतराने तर अर्थ बांधला गेला. शक्यता उरल्याच नाहीत.
आता शेवटी मला आवडलेल्या काही बाशोच्या हायकू
From the heart
of the sweet peony
A drunken bee
Dew drops -
How better wash away
World's dust?
Summer Grasses -
All that remains
Of soldiers' dreams
If I'd the knack
I'd sing like
Cherry flakes falling
Comments
Post a Comment