भाषांची लय

२४ डिसेंबरच्या लोकरंग पुरवणीत शांता गोखले यांचा द्वैभाषिक लिखाणाचा दुस्तर घाट ह लेख वाचनात आला. त्यात त्यांनी द्वैभाषिक लिखाण आणि भाषांतराबाबत छान मुद्दे मांडलेत. 
तो लेख वाचल्यावर मला सुचलेले मुद्दे :


मराठीत शिकलेल्या माणसाला व्यावसायिक दृष्टया द्वैभाषिक असणं तसं तर अपरिहार्य आहे. (इथे आपण, सामान्य माणसाचं कुठल्याच भाषेवर प्रभुत्व नसणं, त्याची टोचणी नसणं ह्या बाबत बोलतंच नाही आहोत, नाही तर ती एक मोठी तक्रारमालिका (rant) होईल)
वाचनाबाबत द्वैभाषिक असणं ऐच्छिक आहे. तर एक वाचक म्हणून मी कुठल्या भाषेतलं पुस्तक निवडीन? मूळ भाषेतलं, दर्जानुसार आणि उपलब्धता हे उघड मुद्दे बाजुला काढले तर, तुम्ही म्हणता तशी वाचनभाषेची निवड वैयक्तिक आहे. जसं मला भारतीयांचे भारतीय अनुभव मराठीतच वाचायला आवडतात. आपल्या महाकाव्यांवरचं युगान्त जेवढं भावतं तेवढी इंग्रजी सीता अथवा देवदत्त पटनाईकांची पुस्तक नाही जमत. हे माझे वैयक्तिक अनुभव हं! ह्याचाआणखी एक अनुभव तुम्हाला सांगते, सगळ्याच वेबसिरीजमधली भाषा शिवराळ असते, आणि तशी आता ती अंगवळणी पडलीय. पण sacred games मध्ये जेंव्हा मराठी शिव्या आल्या तेंव्हा त्या शब्द्श: अर्थासकट येऊन भोसकून गेल्या हो!
लिखाणाबद्द्ल म्हणाल तर,
 संगणक अभियंता असल्याने माझी सतत, लांबचलांब तांत्रिक दूरभाषणं चालू असायची, ते ऐकतच मोठ्या झालेल्या माझ्या मुलीने मला एकदा सांगितले, "आई तुझा त्यांच्याशी बोलताना लागणारा सूर वेगळा असतो! "  मला पुढे निरिक्षणांवरुन जाणवले, की आपला प्रत्येकाचा वेगळी भाषा बोलताना वेगळा pitch लागतो. इंग्रजीचा वेगळा, मराठीचा वेगळा. एक काळी चार  तर  दुसरी पांढरी पाच.  इतकंच काय घरच्या मनीमाऊबरोबर बोलायचा आपला pitch वेगळा असतो जो त्या मांजरीला बरोबर कळतो, भाषा कळली नाही तरी!
मला वाटतं लिखाणाच्या भाषेचं तसं असावं, काही अनुभव, विचार, मतं ही  एका भाषेत सुरेल  वठतात, व्यक्त होतात , तर इतर काही दुसऱ्या भाषेत. ( इथे झोपेतून दचकून जागे झालेल्या बहूभाषिकाने आपल्या मातृभाषेत "आई " म्हणण्याच्या गोष्टीची आठवण ही अपरिहार्य आहे :)
अरूण कोलटकर किंवा गौरी देशपांड्यांच्या दोन भाषेतल्या लेखनाची तुलना करावी असं कधीच वाटलं नाहीशांता गोखले स्वत: दोन्ही भाषेतलं लेखन समर्थपणे करतात, शिवाय genres वेगळे आहेत.
तर, भाषांतर कितीही समर्थ असले तरी काहीतरी राहून जातंय असं वाटतं. कवितांच्या बाबतीत तर फारचं.
मला स्वत:ला इंग्रजी ललित नाही जमत, पण कधी कधी एखादी अर्थछटा असलेला मराठी शब्द सापडत नाही आणि चिडचिड होते

Comments