कथक आणि मी

मी कथककडे तशी खूप उशीरा वळले. पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभी असताना, ह्या वर्षी मी कथक शिकायला सुरुवात केली.
लहानपणापासून शास्त्राकडे कल होता. कॉंप्युटर इंजिनिअर झाले. ते संकल्पनांचं आणि कोडींगचं जग मला मनापसून आवडतं. मोठं वेळखाऊ पण आव्हानदायी क्षेत्र आहे हे. त्यात आवडणारं काम करायला मिळालं. त्या सगळ्यात मी चांगलीच रमले. Product Development च्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या. त्या क्षेत्रात प्रगती केली. त्याच बरोबरीने आधाशासारखं वाचन आणि लहर लागली तर लेखन चालू होतं
दोन एक वर्षांपूर्वी काही कारणाने ह्या एका रेषेत चालणाऱ्या आगगाडीचा सांधा बदलला, आणि मी संगणक शास्त्राबरोबरीने आणि काय करायला आवडेल, ह्याचा आढावा घेतला. त्यात शास्त्रीय नृत्य आणि तेही कथक शिकावं असं प्रकर्षाने वाटलं.
नशीबानं गुरू आभा वांबुरकर – आमच्या आभाताईंनी आनंदानं शिकवायला होकार दिला आणि मी “ताथैथैतत” घटवायला सुरुवात केली.
सुरवातीला थोडी मनाची तयारी करावी लागली. वयामुळे शरीर वळायला वेळ घेत होतं, ‘उपजत’ म्हणतात, तसा काही वरदहस्त नव्हता, फक्त भरपूर उत्साह, त्यामुळे, वर्गात माझी गणना तशी ‘ढ’ category मध्येच होते. ह्याची सवय व्ह्यायला जरा वेळ लागला हो! आपल्या मर्यादा माहीत असल्या तरी खूपायच्या राहतात थोड्याच! पण सगळ्याजणी इतक्या मस्त होत्या ना की ग्रूप आणि दंगा लगेच सुरू झाला. 
आतापर्यंतच्या सगळ्या बौद्धिक उद्योगांपेक्षा (cerebral pursuits) कथक अधिक challenging होते. Challenging in a good sense. नुसता विचारच नव्हता करायचा तर तो विचार शरीराद्वारे करून दाखवायचा होता. म्हणजे वादक तर मी होतेच, पण वाद्य ही मी होते. लेखक मी आणि शब्द ही मी! शरीराच्या नाठाळ वाद्याला लयीत आणायचे, सुंदर आकारात हलते ठेवायचे. एक बहुआयामी आविष्कार! तुमच्याकडून खूप काही demand करणारा. अवधान, वेळ, सातत्य, साधना… ईशसाधना ही अशीच असेल नाही?
कथकमध्ये जरी मी नवशिकी असले तरी मी इथे येताना माझं इतर विषयांचं ज्ञान, साहित्य, संस्कृती, कलेचं भान घेऊन प्रवेश करत होते. कथकचा इतिहास, पारंपारिक बंदिशी, सादरीकरण ह्या सगळ्यांचा संदर्भ मी माझ्यापरीने लावायचा प्रयत्न करत होते. माझ्या सुदैवाने, आभाताईंकडून आम्हाला सतत हे संदर्भ फार उत्तमरित्त्या मिळत गेले. कथकचा रंगमंच विचार, त्रिमिती आणि गतीतून विचारपूर्वक घडवलेले आकृतीबंध, तरी त्याचं एखाद्या शिल्पाप्रमाणे प्रत्येक फ्रेममध्ये परफेक्ट असणं, अशा कितीतरी संदर्भांनी माझी समज श्रीमंत होते आहे. मोठा आनंदाचा ठेवा आहे हा. अर्थात हे आगाऊ ज्ञान “या तोड्यामध्ये - दीड – दीड – एक – एक चक्कर असं तीन वेळा, येतं, दीड अन दीड अन दोन पाच गुणिले तीन पंधरा, म्हणजे हा पंधरा चकरींचा तोडा” आहे असं पाजळून ताईंना चकरावून पण सोडलं आहे मी!
अश्या ‘सर्वांगसुंदर’ कलेच्या अभ्यासासाठी योग्य गुरू मिळणं फार महत्वाचं आहे हे मी स्वानुभवावरून सांगू शकते.
ताईंनी मला वयाची कुठलीही सूट न देता, माझ्याकडून परिपूर्णतेची – perfection ची अपेक्षा करणं, माझा आत्मविश्वास वाढवतं, आणि patiently   त्या परिपूर्णतेला पोचण्यासाठी लागणारा वेळ, परत परत सांगण्याची तयारी, करून घेण्याचा उत्साह माझा धीर वाढवतं. माझ्या कुतुहलाला दाद देत कथकच्या इतर अंगांची, गुरूंची माहिती देणं मला परंपरेशी बांधतं. ह्या बाबतीत आम्ही खरोखर भाग्यवान आहोत.
हे भाग्य आमच्या – आपल्या – गुरूंच्या गुरूंपासून सुरू होतं.
गुऱू पंडिता रोहिणी भाटे ह्या खरोखर महान द्र्ष्ट्या होत्या. Visionary. त्यांनी पुण्यात कथक ची एक संपन्न परंपरा सुरू केली. असं कथक ज्याची पाळंमुळं कथक परंपरेत रुजलेली आहेत. ह्या कथक मध्ये पुणेरी – महाराष्ट्रीय अभिरुची( जी उत्तर भारतीय तहजीब पेक्षा भिन्न आहे) , पुणेरी अचूकता (precision) ही दिसून येते.
बेबीताईंमुळे पुण्याच्या मुली एका निरागस हक्कानं आणि डौलानं आज कथक विश्वात वावरत आहेत. त्यानी जागृत शिष्या तयार केल्या ज्या परंपरा पुढे नेताना, त्यात भर घालत आहेत. असा पाया- सादरीकरणाची मानकं तयार केली जी पुढच्या पिढीला खूप काही करण्याची प्रेरणा देते.
रोहिणीताईंच्या रचनांतून, लेहेजा सारख्या त्यांच्या लिखाणातून, जाणवते – त्या नृत्यातून केवळ बंदिशीतले शब्द अभिनीत करत नाहीत तर त्या ओळींच्या मधलं आजूबाजूचं (between the lines) खूप काही दर्शवतात, सुचवतात.
आभाताईंनी - गुरू लच्छु महाराजांनी कशी  ‘कौन गली गयो श्याम’ ही बंदिश आपल्या भावदर्शनातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली होती – याचं वर्णन केलं – अंगावर रोमांच उभं राहिलं होतं ऐकून.
 हे जे काही आहे- शब्द – सूर – ताल यांच्या पलीकडंच – जे नृत्यच स्पर्श करू शकते - उजळवू (illuminate) शकते. ते एखादया सुदूर ताऱ्यासारखं खुणावतंय. कधी पोहोचीन तिथे! ह्या नाही तर कदाचित पुढील जन्मी! पण तिथं पोहोचायची वाट किती सुडौल आहे! त्यावर अविरत आनंदाने नाचत जायचं – इतकंच!

Comments